[Marathi] डहाणूमध्ये मुसळधार, २४ तासांत २९९ मिमी पाऊस, पुढील ३ दिवसात मासिक सरासरी गाठणार

July 1, 2019 2:58 PM | Skymet Weather Team

उशिरा आगमनानंतरही सक्रिय नैऋत्य मान्सूनमुळे उत्तर कोकण, गोवा आणि गुजरातच्या काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. गुजरातमधील सूरतपासून महाराष्ट्रातल्या महाबळेश्वरपर्यंत जोरदार पाऊस होत आहे. गेल्या २४ तासांत डहाणू मध्ये तब्बल २९९ मिमी पावसाची नोंद झाली असून अजूनही पाऊस पडत आहे, त्यामुळे गेल्या २४ तासात डहाणू देशातील सगळ्यात जास्त पावसाळी ठिकाण राहिले आहे. याशिवाय डहाणू मध्ये आगामी दिवसांत जोरदार पावसाची शक्यता असून संपूर्ण महिन्याची पावसाची सरासरी पुढील तीन दिवसांतच गाठली जाण्याची शक्यता आहे.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते, डहाणूचे जुलै महिन्याचे मासिक सरासरी पर्जन्यमान ६२८. ३ मिमी असून जुलैच्या पहिल्याच दिवशी सरासरीच्या निम्मे लक्ष्य गाठले गेले आहे. याचे सगळे श्रेय संपूर्ण शहरात झालेल्या जोरदार पावसाला जाते.

विक्रमी पाऊस:

याआधी १ जुलै १९५८ रोजी २४ तासांच्या अवधीत डहाणू मध्ये अतिशय मुसळधार पाऊस झाला असून ४३१ मिमी इतक्या मोठया पावसाची नोंद झाली होती.

अंदाजः

सद्य स्थिती पाहता, शहरात अजून जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे डहाणू जुलै महिन्याचे मासिक सरासरी पर्जन्यमानाचे लक्ष्य जुलैच्या पहिल्याच आठवड्यात गाठेल अशी शक्यता आहे. या जोरदार पावसाचे कारण दक्षिण गुजरात आणि आसपासच्या उत्तर कोकण आणि गोवा येथील चक्रवाती प्रणाली होय. या प्रणालींच्या प्रभावामुळे डहाणूसह संपूर्ण उत्तर कोकण आणि गोव्यामध्ये पुढील तीन ते चार दिवस जोरदार पाऊस पडेल.

या प्रणाली व्यतिरिक्त, उत्तर ओडिशामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही यंत्रणा अजून तीव्र होऊन मध्य भारताकडे सरकेल. या प्रणालीच्या प्रभावामुळे ४ जुलै पर्यंत उत्तर कोकण,गोवा आणि आसपासच्या दक्षिण गुजरातमध्ये जोरदार पाऊस पडेल. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपूर्ण उत्तर कोकण आणि गोवा क्षेत्रासाठी सर्वाधिक पावसाचा आठवडा ठरणार आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES