[Marathi] कयार नंतर चक्रीवादळ माहा मुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागात पाऊस अपेक्षित

October 31, 2019 1:04 PM | Skymet Weather Team

कयार नंतर हा चक्रीवादळ 'माहा' मुळे अलीकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागात पाऊस होत आहे.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, ही प्रणाली वायव्य दिशेने वाटचाल करत राहील आणि मध्य-पूर्व अरबी समुद्रामध्ये राहील, तीव्रतेत वाढू होवून ते आज तीव्र चक्रीवादळ बनेल.

या गतिविधींच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोकण आणि गोवा येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, आणि हर्णे येथे येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या पावसासोबत ३०-४० किमी प्रतितास वेगाचा वारा देखील वाहण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुढील दोन ते तीन दिवस समुद्र देखील खवळलेला राहण्याची अपेक्षा आहे, म्हणूनच मच्छिमार बांधवांना खोल समुद्रात जाताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

मुंबईत देखील पावसाचा जोर वाढेल आणि १ नोव्हेंबरच्या सुमारास हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होण्याची अपेक्षा आहे.

या दरम्यान, बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे महाराष्ट्रातील अंतर्गत भागात आर्द्रता वाढवतील. तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचे संगम क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात १ नोव्हेंबरपर्यंत विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील. पुणे शहरात देखील पुढील दोन दिवस गडगडाटासह विखुरलेला पाऊस राहण्याची शक्यता आहे.

यापूर्वीच गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मध्यम सरींनी जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भात देखील विखुरलेला पाऊस झाला आहे.

स्कायमेटकडील उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार, २४ तासांच्या कालावधीत सोलापुरात ३३ मिमी, नाशिकमध्ये १४ मिमी, पुणे ८ मिमी आणि सातारा येथे ६ मिमी पावसाची नोंद झाली.

एका पाठोपाठ येणाऱ्या चक्रीवादळांमुळे महाराष्ट्र राज्यात ऑक्टोबरमध्ये असामान्य पाऊस पडला आहे. या प्रणालींमुळे राज्यातील हवामान प्रभावित झाले असून कोकण आणि गोवा येथे सध्या १३३ टक्के आणि मध्य महाराष्ट्रात १७२ टक्के इतके पावसाचे आधिक्य आहे.

दरम्यान १ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातही चांगला पाऊस झाला असून सरासरीच्या २१३% इतका पाऊस पडला आहे.

Image Credits – NYOOOZ

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES