चक्रीवादळ महा आता तीव्र चक्रीवादळ झाले आहे. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ५:३० वाजता, ते अक्षांश १४.६ उत्तर आणि रेखांश ७१.७ पूर्वेस होते. चक्रीवादळ वायव्य दिशेने जाण्याची शक्यता आहे आणि आज संध्याकाळपर्यंत ते अति तीव्र चक्रीवादळ होऊ शकते. पूर्वी ते पश्चिम-वायव्य दिशेने जात होते.
भौगोलिकदृष्ट्या, चक्रीवादळ चेरियापानी बंदराच्या ३०० किमी उत्तरेस, तर अमिनीदिवीच्या ४०० किमी उत्तर-वायव्य आणि मंगलोरच्या ३९० किमी पश्चिम-वायव्य दिशेस आहे.
चक्रीवादळ हळूहळू किनाऱ्यापासून दूर जात असल्याने तामिळनाडूत पावसाचा धोका कमी झाला आहे. तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यात येत्या २४ तासांत फक्त हलका पाऊस पडेल. मात्र, आज कर्नाटक किनारपट्टीवर काही प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण दक्षिण द्वीपकल्पात पावसाचा जोर कमी होईल.
अत्यंत तीव्र चक्रीवादळ नंतर वायव्य दिशेने पुढे जाईल. या वादळाच्या प्रभावामुळे लक्षद्वीप बेटांवर जोरदार वारे आणि ऊंच लाटांचा अंदाज आहे. पुढील २४ तास बेटांवर खबरदारी बाळगावी लागणार आहे.
चक्रीवादळ वायव्य दिशेने वाटचाल करत असले तरीही केरळ, कर्नाटक किनारपट्टी तसेच दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील. तसेच हळूहळू वाऱ्याचा वेग महाराष्ट्र व गुजरात किनारपट्टीवरही वाढेल.
स्कायमेट हवामानतज्ञांच्या मते, संपूर्ण पश्चिम किनारपट्टीसाठी ३ नोव्हेंबरपर्यंत खबरदारी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच मच्छीमार बांधवांनी किमान ३ नोव्हेंबरपर्यंत समुद्रात जाऊ नये.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर येत्या २४ तासांत दक्षिण मध्य-महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा तसेच कर्नाटकच्या किनारी भागांतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाळी गतिविधी कमी होतील. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये एक-दोन मध्यम सरींसह थोड्या प्रमाणात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
३ नोव्हेंबर नंतर हवामान प्रणाली आणखी दूर गेलेली असेल. त्यामुळे समुद्राची परिस्थिती देखील सुधारण्यास सुरूवात होईल व वाऱ्याचा वेग देखील कमी होऊ लागेल.
Image Credits – Herald Publicist
Any information taken from here should be credited to Skymet Weather