[Marathi] जम्मू आणि काश्मिर मध्ये ढगफुटी, १ मृत्युमुखी, ३ जण बेपत्ता

July 17, 2015 5:01 PM | Skymet Weather Team

मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी जम्मूकाश्मीर मधील श्रीनगर-लेह रस्त्यावर सोनमर्ग येथे ढगफुटी झाली आहे. प्रसार माध्यमांनुसार या ढगफुटीत एका मुलीने आपले प्राण गमावले आहेत आणि त्याबरोबरच ४ जण बेपत्ता आहेत. तसेच दोन घरांचेही नुकसान झाले आहे आणि अनेक वाहने पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत.

हि ढगफुटी संध्याकाळच्या ७ वाजता केल्लन गावाजवळील गगनगिरीच्या भागात झाली. या घटनेनंतर श्रीनगर – लेह महामार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच या भागाच्या जवळपास राहणाऱ्या चार स्पेनच्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.

या दरम्यान खराब हवामानामुळे अमरनाथ यात्राही थांबविण्यात आली आहे. तसेच दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहे आणि एकाही यात्रेकरूला वातावरणात सुधारणा होईपर्यंत पुढे जाण्याची परवानगी नाही.

या भागात भूस्खलन देखील झाले आहे आणि नागरिकांना सुरक्षा जवानांनी सुरक्षित ठिकाणी छावणीवर स्थलांतरित केले आहे. शेषनाग येथील बलताल ते अमरनाथ यात्रेच्या मार्गातील सेतुलाही नुकसान झाले आहे. आतापर्यंत या घटनेमुळे कुणालाही दुखापत झाल्याचे आढळले नसून या पावसाच्या पाण्यामुळे एक रिकामी बस वाहून गेली आहे.

भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार जम्मूकाश्मीर वर असलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे या भागात येत्या २४ ते ४८ तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर २० जुलै पर्यंत हलक्या पावसाच्या सरी मात्र सुरूच राहतील.

याच काळात हिमाचल प्रदेशातही चांगला पाऊस होण्याची शक्यता असून उत्तराखंडातही येत्या २ दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. या पावसाची तीव्रता या तिन्ही डोंगराळ भागात २० जुलै च्या आसपास कमी होईल कारण त्याकाळात पश्चिमी विक्षोभ या भागापासून दूर सरकलेला असेल.

Image Credit: livemint.com

 

OTHER LATEST STORIES