काल छत्तिसगढ मधील अंबिकापुर जवळ असलेले तीव्र स्वरूपाचे कमीदाबाचे क्षेत्र वायव्येच्या दिशेने पुढे सरकले आहे. आणि सध्या ते मध्यप्रदेशातील सतना येथे आले आहे. पुढील २४ तासात हे क्षेत्र अजून थोडे पश्चिम-वायव्येकडे सरकेल असा अंदाज आहे.
सर्वसामान्यपणे जेव्हा अशी एखादी कमी दाबाची प्रणाली वायव्येकडे सरकते तेव्हा ती प्रणाली अरबी समुद्रातून आर्द्रता ओढून आणते. जर अश्या प्रणालीला आर्द्रतेचा पुरवठा झाला तर तिच्यामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगड सहित मध्य भारतावर बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होवू शकतो.
सद्यस्थितीत वातारणात बऱ्याच उंचीवर अजून एक कमी दाबाचा पट्टा दिसून येतो आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तरभारतातील हिमालयाच्या पायथ्यापासून ते कराचीच्या पश्चिमे पर्यंत पसरलेला आहे. हा पट्टा हळूहळू पूर्वेकडे सरकत असल्याने मध्यभारातावर असलेल्या तीव्र कामीदाबाच्या पट्ट्याला वेगाने वायव्येला सरकण्यास प्रतिबंध करीत आहे. त्यामुळे हे क्षेत्र काहीकाळ मध्यप्रदेश्याच्या पश्चिम भागावर व त्यालगतच्या राजस्थानचा प्रदेश येथे स्थिरावण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व राजस्थानचा काही भाग आणि उत्तरप्रदेशाचा नैऋत्य भाग येथे येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
या कमीदाबाच्या क्षेत्रा बरोबरच जम्मू काश्मीर वर असलेला पश्चिमी विक्षोभ सुद्धा मध्यभारातावर पावसाला पूरक असे वातावरण तयार करीत आहे. या दोन्ही प्रणालीचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील २४ ते ३६ तासात दिल्लीसह उत्तरभारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
Image Credit: Newsnation