या वर्षी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने जून महिन्यातील चोवीस तासातील सर्वोच पातळी पार केली आहे. एवढेच नव्हे तर जून महिन्याची पावसाची सरासरी सुद्धा दहा दिवस बाकी असताना पूर्ण झाली आहे. पुढील दहा दिवसात मुंबईतील पाउस १००० मिमी हा आकडा गाठण्याची शक्यता आहे.
भारतातील स्कायमेट संस्थेच्या हवामान विभागानुसार गुरुवारी सकाळी साडेआठ पासून ते शुक्रवारी सकाळी साडेआठ पर्यंत मुंबईत २८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पूर्वी जून मधील सर्वात जास्त पावसाची नोंद २४ जून २००७ रोजी (२०९ मिमी) झाली होती.
मागील ४८ तासात मुंबईत ४७३ मिमी पावसाची नोंद झाली असून त्यामुळे आता पर्यंत जून मधील पावसाचा आकडा ७२७ मिमी पर्यंत पोहचला आहे. या मुळे या स्वप्ननगरीतील जूनची पावसाची सरासरी (५२३ मिमी) सुद्धा ओलांडली गेली आहे.
या धोधो झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई आणि उपनगरातील खुपसा भाग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. रस्त्यांवर जागोजागी पाणी साठल्याने वाहतुकीचा तर बोजवारा उडाला होता. पावसाचे पाणी बऱ्याच घरांमध्ये शिरले होते.
येत्या ४८ तासात मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत राहील आणि नंतर पुन्हा त्याचा जोर वाढेल. पुढील काही दिवस असाच चांगला पाऊस येत राहील त्यामुळे या महिन्या अखेरपर्यंत १००० मिमी हा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे.
Image Credit: asiancorrespondent.com