[Marathi] विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस थोडा काळ विश्रांती घेणार

July 9, 2019 6:35 PM | Skymet Weather Team

नुकत्याच झालेल्या चांगल्या पावसामुळे कोकण आणि गोवामध्ये ११ टक्के तर मध्य-महाराष्ट्रात ९ टक्के पावसाचे आधिक्य आहे, याउलट विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अजूनही अनुक्रमे २२ आणि ३४ टक्के पावसाची तूट आहे.

पुढील २४ तास विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य-महाराष्ट्रात थांबून थांबून पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि गोवा येथे चांगल्या पावसाची शक्यता असून मुंबईमध्ये देखील काही जोरदार सरींची शक्यता आहे.

त्यानंतर मात्र,पावसाचा जोर कमी होईल परंतु सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण कोकणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तसेच २४ तासांनंतर महाराष्ट्रातील अंतर्गत भागांत पावसाचे प्रमाण तुलनेने आणखी कमी होईल.

११ जुलैनंतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत कोरड्या हवामानाची स्थिती पुनरागमन करेल, तर मुंबई आणि आसपासच्या उत्तर कोकणातील जिल्ह्यांत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तथापि, कोकण आणि गोव्याच्या दक्षिणेकडील भागांवर हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

पुढील चार ते पाच दिवसात जोरदार पाऊस परतण्याची शक्यता नाही. तसेच मान्सून ट्रफ उत्तरेकडे सरकेल त्यामुळे १६ जुलै पर्यंत हवामान कोरडे राहणार असून महाराष्ट्रातील पावसाबद्दल सांगायचे तर मान्सून काही काळ विश्रांती घेईल.

OTHER LATEST STORIES