जुलै महिन्याच्या सुरुवातीस संपूर्ण देशभरात चांगला पाऊस झाला आहे. महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत मान्सून मध्य, पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात खूप सक्रिय होता आणि त्यामुळे देशभरातील पावसाच्या तुटीत दररोज २-३ टक्के घट झाली.
स्कायमेटकडे उपलब्ध आकडेवारीनुसार १ जून ते १३ जुलै दरम्यान देशात झालेल्या पर्जन्यवृष्टीचा आढावा घेतल्यास देशभरात सरासरी २७९.८ मिमीच्या तुलनेत २४६.३ मिमी इतका पाऊस झाला आहे, याचा अर्थ ३० जून रोजी असलेली संचयी तूट (देशभरात असलेली पावसाची कमतरता) ३३% वरून १२%पर्यंत खाली आली. हा जुलैच्या पहिल्या १० दिवसात झालेल्या चांगल्या पावसाचा परिणाम आहे.
देशातील पावसाची विभागवार तूट खालीलप्रमाणे
तथापि, आता परिस्थिती बदलेल. स्कायमेटने आधीच वर्तवल्यानुसार, मान्सूनच्या विश्रांतीचा काळ सुरु झाला असून देशभरात पावसात काही काळ खंड पडेल. या घटनेची साक्ष म्हणजे देशभरात पावसाची कमतरता काल १३% पर्यंत वाढली आहे. देशभरात पावसाळी गतिविधी कमकुवत झाल्यामुळे पावसाच्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तसेच मान्सूनची उत्तर सीमा (NLM) १० जुलैपासून सरकलेली नाही.
एनएलएम सध्या बारमेर, जोधपूर, चुरु, लुधियाना आणि कपूरथलातून जात आहे
सामान्यतः, मान्सून ट्रफ रेषा हिमालयाच्या पायथ्याशी सरकल्यामुळे मान्सूनच्या विश्रांतीची परिस्थिती साधारणपणे ऑगस्ट महिन्यात दिसून येते. जुलै महिन्यामध्ये अशा प्रकारची स्थिती प्रस्थापित होणे दुर्मिळ आहे, सध्या अशी परिस्थिती आहे. देशातील बहुतेक भागांत पाऊस याकाळात विश्रांती घेणार आहे.
मान्सून एक आठवड्यासाठी कमकुवत झाल्यामुळे, पूर्व भारतात काही ठिकाणी, हिमालयाच्या पायथ्याचा भाग, पूर्वोत्तर भारत, कोकण आणि गोवा येथे पाऊस पडेल, तर उर्वरित देशांत कोरडे हवामान दिसून येईल. मध्य आणि उत्तरपश्चिम भारतात सगळ्यात जास्त बिकट परिस्थिती राहील. दक्षिण भारतामध्ये अपुऱ्या पावसामुळे आधीपासूनच २८% पावसाची तूट आहे.परंतु या मान्सून विश्रांती कालावधीत रायलसीमा आणि तमिळनाडूमध्ये थोड्याफार पावसाची शक्यता आहे.
अजून एक आठवड्यापर्यंत मान्सून कमजोर झाल्यामुळे मराठवाडा, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये कापूस, सोयाबीन, मूग आणि मक्याची पेरणी संथ झाली असून या पिकांना फटका बसणार आहे. तांदूळ, डाळी सारख्या अन्य खरीप पिकांचेही अपुऱ्या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान ,१७ जुलैच्या आसपास बंगालच्या खाडीत एक हवामान प्रणाली तयार होत आहे परंतु तयार झाल्यानंतर दोन दिवसांतच तिचा प्रभाव नष्ट होणार असल्याने ही प्रणाली उपयुक्त ठरणार नाही. या काळात दक्षिण द्वीपकल्प आणि ओडिशाच्या काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, संपूर्ण देशात पुढील पूर्ण आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता नाही.
मुंबईच्या सभोवतालची मान्सून गतिविधी देखील दुर्बल होणार आहे. त्यामुळे पुढील १० दिवसांत मुंबईमध्ये पूर सदृश्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाही. तसेच मागील पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचा जोर देखील कमी राहील.
प्रतिमा क्रेडीट: हिंदुस्तान टाइम्स
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे