जुलै महिन्याच्या अखेरीस भारतावरील हवामान प्रणाली थोड्या कमकुवत झाल्या व पावसाचा जोर ओसरला. परंतु ऑगस्टच्या सुरवातीस पुन्हा काही हवामान प्रणाली जोर धरु लागल्यामुळे या आठवड्याच्या शेवट चांगल्या पावसाने होण्याची शक्यता आहे. भारतातील बऱ्याच भागात पाऊस ओसरला होता तो येत्या काही दिवसात पुन्हा पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. येत्या काही दिवसात उत्तर भारतातील काही भाग, विशेषतः पंजाब, हरियाणा आणि दिल्ली च्या आजूबाजूचा प्रदेश आणि पूर्व भारतात पश्चिम बंगाल, ओडिशा व झारखंड येथे चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. या प्रदेशातील काही भागात मुसळधार वर्षा होण्याची शक्यता असल्याने तेथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.
भारताच्या पूर्वेकडील भागातील पाऊस
सध्या बांगलादेशाला एक चक्रीवादळ धडकले, आत्तापर्यंत त्या चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र अश्या कामीदाबाच्या क्षेत्रात झाले आहे. या घडामोडींमुळे पूर्व भारतात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस होतो आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार हि प्रणाली आता पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर त्याचे रुपांतर कमीदाबाच्या क्षेत्रात होईल त्यामुळे बऱ्याच भागावर मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
स्कायमेटकडे असलेल्या आकडेवारीनुसार आज सकाळी ८.३० पर्यंत मागील चोवीस तासात पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे १३१ मिमी इतका पाऊस झाला. पश्चिम बंगाल मधील बांकुरा येथे सुद्धा ५२ मिमी पावसाची नोंद झाली. तर उत्तरप्रदेशातील गोरखपूर व वाराणसी येथे अनुक्रमे १६१ व ६५ मिमी पावसाची नोंद झाली. याच बरोबर डाल्टनगंज व गया येथे अनुक्रमे ७१ व २३ मिमी पावसाची नोंद झाली.
भारताच्या ईशान्येकडील भागातील पाऊस
येत्या काही दिवसात भारताच्या ईशान्येकडील भागात सुद्धा पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आत्तापासूनच चांगला पाऊस होण्यास सुरवात झाली आहे. उदाहरणादाखल सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात मणिपूर मधील इम्फाळ येथे ८८ मिमी तर मेघालयातील चेरापुंजी व शिलॉंग येथे अनुक्रमे ८६ व ६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
भारताच्या पश्चिम व उत्तर भागातील पाऊस
राजस्थानवर असलेले कमीदाबाचे क्षेत्र व जम्मू आणि काश्मीर येथे असलेला पश्चिमी विक्षोभ या दोन्हीच्या एकत्रित प्रभावामुळे उत्तराखंड व हिमाचल प्रदेश येथे चांगला पाऊस झाला. डेहराडूनला ७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील दोन दिवस सुरूच राहण्याची शक्यता आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस
मागील २४ तासात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर भाग म्हणजे कोंकण व कर्नाटकाची किनारपट्टी येथे चांगला पाऊस झाला. रत्नागिरीला ८३ मिमी तर होनावर आणि मेंगलोर येथे अनुक्रमे ३० व १६ मिमी पावसाची नोंद झाली.
तामिळनाडूच्या किनारपट्टीवर देखील बऱ्याच कालावधीनंतर चांगल्या पावसाची नोंद झाली. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे गेल्या २४ तासात ५६ मिमी पाऊस झाला. रायलसीमामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलका पाऊस झाला. आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवरील नेल्लोर आणि ओंगोल येथे गेल्या चोवीस तासात अनुक्रमे ११ व ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मध्यभारतावरील पाऊस
मध्य भारत हा एकच भाग असा आहे कि जेथे गेल्या चोवीस तासात पावसाने दडी मारली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार येत्या २४ तासात मध्यभारतावर विशेषतः मध्यप्रदेशावर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
Image Credit: Indiatvnews.com