मुंबईत यंदा मान्सूनने खूपच जोरदार सुरुवात केली होती. सर्वसाधारणपणे मुंबईत जून महिन्यात सरासरी पाऊस ५२३ मिमी पाऊस होत असताना यंदा मात्र जून महिन्यात ११७४ मिमी पावसाची नोंद झाली होती. आणि हा टप्पा मुंबईतील पावसाने फक्त तीन दिवसात गाठला होता.शहरात तीन दिवसात ६०४ मिमी पाऊस झाला होता.
तसेच जुलै महिना मात्र फारसा चांगला ठरला नाही. मुंबईत जुलै महिन्यात फक्त ३५९ मिमी पावसाची नोंद झाली जेथे मासिक सरासरी ८०० मिमी असते. कारण जुलै महिना हा मान्सून काळातील सर्वाधिक पावसाचा असतो. तसेच यंदाचा जुलै महिना हा गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी पावसाच्या नोंदीचा ठरला आहे.
मुंबईकरांना ऑगस्ट महिन्याकडून थोडीफार आशा होती कारण मान्सून काळात या महिन्यातही मुंबईत चांगला पाऊस होतो. परंतु या महिन्यातही मान्सूनने मुंबई शहराला खो दिल्यासारखेच झाले आहे. सांता क्रुझ च्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत १५४.१ मिमी पावसाची नोंद झाली असून या महिन्याची मासिक सरासरी ५३० मिमी पाऊस होतो. हि सुद्धा गेल्या दहा वर्षातील पावसाची सर्वात कमी नोंद आहे. याआधी २०१३ साली २५६.३ मिमी पावसाची नोंद झाली होती, हि नोंद गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी नोंद ठरली होती.
मुंबई शहरात नेहमी किनारपट्टी जवळील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस होत असतो. परंतु यंदा हा पट्टा हवा तसा सक्रीय न झाल्यामुळे मुंबईत गेल्या दोन महिन्यांपासून कमी पाऊस होतो आहे. तसेच गेल्या दहा दिवसात मुंबईत फक्त ४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
आता सप्टेंबर महिन्याचा आढावा घ्यायचा झाल्यास नेहमी या महिन्यात पावसाची तीव्रता कमी होताना दिसते. तसेच नैऋत्य मान्सूनही भारतातून काढता पाय घेण्यास सुरुवात करताना दिसून येतो. मुंबईत सप्टेंबर महिन्यात साधारणपणे ३१२ मिमी पावसाची नोंद होत असते. या वर्षी हा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे. परंतु त्यामुळेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची भर निघेलच असे मात्र नाही.