यंदाच्या वर्षातील मान्सून काळात मुंबईत तसा फारसा पाऊस झालेला नाही. जून महिन्यात झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसानंतर जुलै आणि ऑगस्ट हे महिने मात्र कोरडेच होते. ऑगस्ट महिन्यात नेहीमीची मासिक सरासरी ५२९.७ मिमी असते मात्र यंदा १५४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सप्टेंबर महिना मात्र या आधीच्या महिन्यांपेक्षा चांगला ठरलाय. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाकडे असलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मुंबईत १२०.१ मिमी पाऊस झाला आहे. या महिन्याची मासिक सरासरी ३१२.३ मिमी असते. या महिन्यात आतापर्यंत एकदाच म्हणजे १० ते १४ सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस झाला होता आणि त्यावेळेस १०३ मिमी पावसाची नोंद झाली होती.
अशाच चांगल्या पावसाची हजेरी पुन्हा एकदा मुंबईला लागण्याची शक्यता आहे. स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ते २० सप्टेंबर दरम्यान चांगलाच पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या छत्तीसगड आणि त्यालगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले असून ते पश्चिम वायव्येकडे सरकत असल्याने या भागात त्याचा परिणाम १८ सप्टेंबर पासून सुरु होईल. शहरातील एक दोन भागात मुसळधार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणे अपेक्षित आहे.
मुंबईच्या पावसाचा इतिहास बघितल्यास मुंबईत सप्टेंबर महिन्यात साधारणपणे १४.४ दिवस पाऊस होतो. आतापर्यंत २४ तासातील सर्वात जास्त पाऊस होण्याची नोंद २३ सप्टेंबर १९८१ या वर्षी ३१८.२ मिमी झाली होती.
याच दरम्यान शहरातील कमाल तापमान सध्या ३० अंश से. च्या आसपास स्थिरावले आहे. या होणाऱ्या पावसामुळे या तापमानात २ ते ३ अंश से. ने कमी होण्याची शक्यता आहे.
Image Credit: karavalitimes.com