मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा काल जोरदार पावसाने संपवली. अरबी समुद्रात उपस्थित हवामान प्रणाली जी आता चक्रीवादळात रूपांतरित झाली आहे हि या पावसामागील प्रमुख कारण आहे. संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळ बनेल अशी अपेक्षा आहे. "वायु" चक्रीवादळ सौराष्ट्राच्या किनाऱ्याकडे मार्गक्रमण करत असून परिणामी या प्रदेशात मुसळधार पाऊस होवू शकतो.
गेल्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ४० मिमी पावसाची नोंद केली गेली तर कुलाबा येथे २५ मिमी पाऊस झाला.
आज दुपारनंतर चक्रीवादळ "वायु" मुंबईच्या समांतर दिशेत असेल त्यामुळे शहर व आसपासच्या परिसरात पावसाचा जोर वाढेल. संध्याकाळच्या वेळी पावसासह वेगवान वारे देखील वाहतील अशी अपेक्षा आहे, तसेच वातावरण देखील ढगाळ असेल.
पुढील दोन-तीन दिवस मुंबईत पाऊस टिकून राहण्याची अपेक्षा असून व्याप्ती देखील विस्तृत असू शकते. चक्रीवादळ वायूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील या पूर्वमोसमी पावसामुळे आल्हाददायक वातावरण होईल व काही प्रमाणात तापमानात देखील घट होईल. पावसामुळे मुंबईतील संध्याकाळ नेहमीपेक्षा जास्त सुखद होईल. दरम्यान कोकण आणि गोव्याच्या देखील जोरदार पावसाची अपेक्षा आहे.
चक्रीवादळ "वायू" मुळे गुजरातच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून पूरसदृश्य परिस्थिती ओढवू शकते. याउलट मुंबईत पावसाचा जोर तुलनेने कमी असेल.
नैऋत्य मान्सूनने मुंबईतील आपली आगमनाची तारीख लांबविली असली तरी लवकरच आगामी दिवसांमध्ये मान्सून मुंबईत धडकणार आहे, ज्यामुळे चातकासमान आतुरतेने वाट पाहत असलेल्या मुंबईकरांची पावसाची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
Image Credit: Indian Express
Please Note: Any information picked from here must be attributed to skymetweather.com