[MARATHI] JATIN SINGH, MD SKYMET: देशात बऱ्याच भागांत पाऊस आणि गारपीटीची शक्यता, उत्तर भारतात शीतलहर, मध्य भारतात अवकाळी हवामान विषयक गतिविधी, दिल्लीत नवीन वर्षाचे स्वागत पावसाने

December 30, 2019 7:41 PM | Skymet Weather Team

गेल्या आठवड्यात उत्तरेकडील डोंगररांगात शीतलहरीची परिस्थिती कायम होती आणि मनाली, श्रीनगर, गुलमर्ग, मुक्तेश्वर आणि पहलगाम यासारख्या ठिकाणी शून्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील मैदानी भागांवर दिवसा देखील थंड वातावरण तसेच कडाक्याच्या थंडीमुळे शीतलहरीची नोंद झाली. दिल्लीत २.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे, जे हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे आणि १९०१ नंतर डिसेंबर मधील दुसर्‍या क्रमांकाचे नीचांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. शीतलहर मध्यप्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमधील काही भागांपर्यंत पोहोचली आहे.

ईशान्य मान्सूनचा हंगाम जवळजवळ संपला आहे, सर्व ५ हवामान उपविभागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मान्सूननंतरच्या हंगामात देशभरात विक्रमी ३० टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

देशात बऱ्याच भागांत पाऊस आणि गारपीट, हिवाळा तीव्र होण्याची शक्यता

सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे उत्तरेकडील डोंगराळ राज्यांत ३१ डिसेंबर व १ आणि २ जानेवारी रोजी पाऊस पडेल. त्याच कालावधीत, दिल्ली एनसीआर क्षेत्रासह उत्तर भागात गडगडाटासह विखुरलेला पाऊस होण्याची अपेक्षा असून काही ठिकाणी जोरदार वार्‍यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पावसाचा जोर वाढेल. आणखी एक सक्रिय पश्चिमी विक्षोभ ५ जानेवारीच्या सुमारास विकसित होईल, ज्याचा प्रभाव डोंगरारांगांवर आणि त्यालगतच्या मैदानावरील वातावरणावर होईल.

पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये १, २ आणि ३ जानेवारी रोजी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये २ तारखेला पावसाचा जोर वाढेल तर उत्तरी आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये २ व ३ तारखेला अत्यंत तीव्र गतिविधींची अपेक्षा आहे. या सरींबरोबर काही ठिकाणी गारपीट होईल आणि ४ जानेवारीपासून या प्रदेशातून परतीस सुरवात होईल.

गेल्या आठवड्याप्रमाणेच गुजरात वगळता मध्य भारतात पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ३० डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत पावसाळी गतिविधींची नोंद केली जाईल. ह्या हवामान विषयक गतिविधी हळूहळू पूर्वेकडे ओडिशा आणि छत्तीसगडकडे सरकतील. ४ जानेवारीपासून सुरू झालेल्या पावसाच्या परतीस सुरुवात होताच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतातील बर्‍याच ठिकाणी हलका पाऊस, तर आंध्रप्रदेशची किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटकात मध्यम हवामान विषयक गतिविधी नोंदविल्या जातील. आठवड्याच्या पूर्वार्धात चेन्नईमध्ये काही प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून उत्तरार्धात कमी होत जाईल.

दिल्ली-एनसीआर मध्ये नवीन वर्षाची सुरुवात पाऊस आणि गारपीटीने

देशाच्या राजधानीत कडाक्याच्या थंडीने जोर धरला असून कडाक्याच्या थंडीमुळे दिवसा देखील थंडावा आहे. १, २ आणि ३ जानेवारी रोजी दिल्ली एनसीआर प्रदेशात गडगडाटासह गारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे. २ तारखेला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून त्यामुळे 'अत्यंत निकृष्ट' ते 'निकृष्ट' असलेल्या हवेची गुणवत्ता सुधारेल अशी अपेक्षा आहे. या कालावधीत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असताना, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तथापि, या पावसाच्या पार्श्वभूमीवर किमान तापमानात घसरण होईल ज्यामुळे शीतलहरीची परिस्थिती निर्माण होईल.

Read in English: MD Skymet, Jatin Singh: Rains and hailstorms to be expected in many parts of the country, cold wave and cold day conditions in North India, unseasonal weather activity in Central India, Delhi to welcome the new year with rains

OTHER LATEST STORIES