कमी झालेल्या पावसामुळे कांद्याच्या लागवडीला खूप उशीर झाला आहे. याची परिणीती हि कांद्याच्या बाजारभावात जवळजवळ ७०% वाढ होण्यात झाली आहे. सध्याचा कांद्याचा बाजारभाव हा गेल्या २ वर्षातील सर्वात जास्त भाव आहे. भारतातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रातील लासलगाव येथे देखील गेल्या दोन आठवड्यात कांद्याचा भाव सरासरी ५४ टक्के वाढलेला असून सध्याचा भाव हा २५५० रुपये प्रती क्विंटल असा आहे.
वर सांगितल्याप्रमाणे कमी झालेला पाऊस हे या भाववाढी मागील प्रमुख कारण आहे. महाराष्ट्रात झालेल्या कमी पावसामुळे शेती मालाची होणारी मागणी आणि पुरवठा यात होणाऱ्या तफावतीमुळे स्वयंपाक घरात महत्वाचा असणारा कांदा अजून महागण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी २०१४-१५ मध्ये कांद्याची पीक हे १८.९ दशलक्ष टन एवढे झाले होते. परंतु अवकाळी झालेल्या पावसामुळे तसेच फेब्रुवारी व एप्रिलमध्ये झालेल्या गारपिटीमुळे बराच कांदा खराब झाला. भारतात स्वयंपाक करताना कांद्याचा वापर हा खूप प्रमाणात होतो त्यामुळे भारतात दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ दशलक्ष टन एवढा कांदा खाल्ला जातो.
या वर्षीचा आत्ता पर्यंतचा पावसाचा आढावा घेतल्यास, जून महिन्यात संपूर्ण भारतभरात चांगला पाऊस झाला. परंतु जुलै मध्ये महाराष्ट्रात खूप कमी पाऊस झाला. मराठवाड्यात तर सर्वात कमी पाऊस झाला आहे. मराठवाडा सोडून उर्वरित महाराष्ट्रात त्यातल्यात्यात विदर्भात गेल्या काही दिवसात पावसाच्या परिस्थितीत थोडीशी सुधारणा झाली आहे. परंतु मराठ्वाद्यातील पावसाची कमतरता भरून निघण्याची शक्यता फारच कमी आहे.
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अश्या परिस्थितीमुळे कांद्याच्या किमतीत तूर्तास घसरण होण्याची काहीच चिन्हे नाहीत.
Image Credit: veggiegardener.com